Friday, 12 June 2020

लावा हृदयात सख्यांनो आशेची वात...!

दशकांमागुन सरली दशके

अन् शतकांच्या गाथा गं,

ना वाटांचा मोह सुटेवा

ना मोहाच्या वाटा गं,

पथ चकव्याचा गोल सरळ वा

कुणास उमगत नाही गं,

प्रवास कसला फरफट अवघी,

पान जळातुन वाही गं॥

कवी संदीप खरे यांच्या या ओळी स्त्रियांसाठी नसतीलही कदाचित पण तरीही स्त्रियांची अनेक शतकांची फरफट अधोरेखित करतात.

अर्थात ज्या संस्कृतीने या स्त्रीला अंधारात लोटले त्यातीलच काही सुज्ञ पुरुषांनी तिला तिची नव्याने ओळखही करून दिली. त्यांना थोडे-बहुत यशही मिळाले पण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. जगात अभिमानाने मिरवण्याइतकी चांगली स्थिती नक्कीच नाही आपल्या स्त्रियांची.

स्त्रियांच्या अस्तित्वाबाबत जेवढा विरोधाभास आढळतो तेवढा इतर कुठल्याच बाबतीत आढळत नाही. मी तुम्हाला पुराणातला एकही दाखला देणार नाही. आपण जे समोर आहे त्याचाच विचार करू.

एकीकडे आकाशभरारी घेणारी स्त्री तर दुसरीकडे आईच्या गर्भातून चौथ्या महिन्यात खुडून टाकलेला स्त्री-भ्रूण.....

एकीकडे देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या स्त्रिया तर दुसरीकडे मारझोड सहन करणाऱ्या आणि त्यालाच आपले प्राक्तन मानणाऱ्या स्त्रिया...

एकीकडे उच्चविद्याविभूषित स्त्रिया तर दुसरीकडे साधे प्राथमिक शिक्षणही न घेता  आलेल्या स्त्रिया... पण सर्वात अधम पातळी कुठली असेल तर ती म्हणजे मुलीचा जन्म घेण्याचा अधिकारच नाकारणे.

आम्हाला वाटते की आम्ही शहरात राहतोआमच्याकडे असे होत नाहीआमचा याच्याशी संबंध नाहीहे सर्व गावच्या ठिकाणी घडते... भलतीच गैरसमजूत ! ग्रामीण भागातील मुलींच्या जन्मदरापेक्षा शहरी भागातील जन्मदर हा कमी आहे... धक्का बसला काइतकाच नाही तर जनगणनेनुसार २००१ पेक्षा २०११ साली शहरी मुलींचे प्रमाण अधिक कमी झाले आहे...

भारतातील ४-५ प्रमुख शहरात राहणाऱ्या मुली.... ज्यांना कदाचित हेही ठाऊक नसेल की त्यांच्यासारख्याच १२-१३ वर्षांच्या अजून काही मुली आहेत ज्या भावंडे सांभाळतातजेवण बनवतातघर सांभाळतातवेळ पडली तर अन्यत्र जाऊन राबतातहीशाळेवर तुळशीपत्र ठेवतात...

मूठभर सुरक्षित मुली किंवा स्त्रिया म्हणजे संपूर्ण समाज नाही. ४ - ५ प्रमुख शहरे म्हणजे संपूर्ण भारत देश नाही. खरे तर तथाकथित सन्मानाने जगणाऱ्या मुलीही याच मुलींच्या परिघात आहेत फक्त त्यांच्या समस्या वेगळ्या आणि यांच्या वेगळ्या... पण समस्या आहेत आणि त्या स्त्री असण्याशी संबंधितच आहेत.

सवाल आहे समाजपुरुषाच्या सोयीने बदलणाऱ्या मानसिकतेचा...

त्याला हवे तेव्हा स्त्री घरी राहिलीत्याला वाटले तेव्हाच ती उंबरठ्याबाहेर पडली... त्याला हवे असेल तरच मुलगी जन्माला येतेनको असेल तेव्हा गवत उपटण्याएवढे सहज तिला गर्भातच उपटून टाकले जातेकोल्ह्या-कुत्र्यांना खायला रुग्णालयाबाहेर किंवा नदीकाठी सोडले जाते...

स्त्री म्हणून जन्म घ्यायचा नाहीकाकुठे हुंड्याचा प्रश्न असतो... कुठे मुलाच्या नावाने वंश वाढवायचा असतो... कुठे अरे बापरेपुन्हा मुलगीचमुलगी म्हणजे ओझेपरक्याचे धन.. तिला कशाला इतके शिकवायचे ही मानसिकता असते... पुन्हा जन्माबरोबर प्रश्न उभा राहतो तो स्त्रियांच्या सुरक्षिततेचा. ज्या वेगाने स्त्रीविषयक गुन्हे  घडत आहे ते बघता त्यांची सुरक्षितता ही आईवडिलांना डोकेदुखीच ठरते आहेयापेक्षा तिला उकळत्या दुधात टाकणे किंवा वाळूत पुरणे जास्त सोपे होते...  

आता तर या गोष्टीही करायची गरज भासत नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की चौथ्या महिन्यात कळते की मुलगी आहे की मुलगा.. कायद्याने गर्भजल परीक्षेला बंदी आहे... पण डॉक्टरकीच्या पवित्र पेशाला काळिमा फासणारे काही नरराक्षस मूठभर दिडक्यांसाठी एका छोटुलीच्या जीवाचा आरामात सौदा करतात...

गेल्या ३० वर्षात जवळपास ७० लाखाहून अधिक अजन्मा आईच्या गर्भातच विरल्या... त्या ७० लाख मुली जन्माला आल्या असत्या तर आज कुठे असत्याकुठे आहे माणुसकीकुठे आहे नैतिकताकुठे आहे कायद्याची जरब?

त्यातूनही जन्म घेतलाच तर काहींच्या नशिबी कधी घरकामाचं तर बालमजुरीचं जोखडकधी लैंगिक शोषणाचे बळीकधी मुलांची तस्करी. निदान हे अन्याय-अत्याचार डोळ्यांसमोर तरी होतात. प्रसंगी ते उघडकीस आले तर त्यावर कायदेशीररीत्या शिक्षा तरी आहेपण समाजपुरुषाने अखंड स्त्रीजातीला वेठीला धरले आहे... गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते ते स्त्रियांच्याबाबतही तंतोतंत लागू होते.  

खरेच स्त्रिया आपले फुलणे विसरल्या आहेत. जेव्हा घराला गरज पडली तेव्हा त्यांना डोईवरचा पदर खांद्यावर घेत घराबाहेर पडावेच लागले.... नोकरीमूलसंसारनातेवाईकसणवार... सर्व जबाबदारी त्यांना उचलावी लागली...

निसर्ग मोठा जादूगार आहे. मानवाचा वंश वाढविण्यासाठी त्याने स्त्रीची शारीरिक रचना वेगळी केली. समाजाने मात्र यावरूनच तिला कमी लेखले. तिचे आभार मानायचे सोडून तिला कधी कडी-कुलपातकधी वस्त्र-अलंकारात, कधी रूढी-बंधनात अडकवून ठेवले.. मग पुरुष तिचा धनी’ झाला.. मालक’ झाला... मालकी हक्काने आपल्या स्त्रीवर तो स्वतःचे नाव कोरु लागला आणि स्त्रिया आपले मूळ नाव विसरून मालकाचे नाव लावू लागल्या....

समाजसुधारकांनी या स्त्रीला शिक्षित केलेअपमानास्पद रूढी-बंधनातून तिला मोकळे करण्याचे प्रयत्न केले... पण त्या बंधनांचे काय जी स्त्रीने स्वखुशीने घालून घेतली आहेतवास्तविक ज्या नावाने स्त्री जन्माला येतेवाढतेसमाजात आत्मविश्वासाने वावरते त्याच नावाने ती शेवटचा श्वासदेखील घेऊ शकते... मग स्वतःची ओळख गमावण्याचा अट्टाहास ती का करते ?

एका स्त्रीने आधी स्वतःचा आणि मग दुसऱ्या स्त्रीचा आदर राखायला शिकले पाहिजे... ती कुमारीती सौभाग्यवतीती विधवा... यापेक्षाही तिचे निखळ स्त्री असणे हे जास्त महत्त्वाचे नाही का?

घर बनते ते त्या घरातील प्रत्येक माणसाच्या सहकार्याने मग सर्व नाती जपायची ती स्त्रीनेचतिला माणूस म्हणून पुरुषाचा आदर करू द्या आणि एक माणूस म्हणूनच आदर मिळवू द्या. रस्त्यावर एखादी स्त्री जाते तेव्हा म्हणतात, ‘स्त्री/बाई’ जातेयपण पुरुष जात असेल तर म्हणतात माणूस’ जातोय... बघातुमचे निरीक्षण काय सांगतेयस्त्री माणूस नाही कावर्षोनुवर्षे जिभेला लागलेलं वळण जे बदलू शकत नाहीत ते सहजासहजी स्त्रीला समान स्थान देतील?

बायको आहेस बायकोसारखी रहानवरा बनायचा प्रयत्न करू नकोस.’..म्हणजे नक्की कायनवऱ्याचा स्तर आणि पत्नीचा स्तर तुम्ही परंपरेने ठरवत आणि पाळत आलातपण ज्या दिवशी घरट्यासाठी स्त्रीने उंबरठ्याबाहेर पाउल टाकले त्यादिवशीच या स्तरातील अंतर कमी होण्यास सुरुवात झाली होती. अर्थात सुंभ जळाला पण पीळ नाही गेला.  

अगदी आजही बदलत्या काळात स्त्रियांवर किती वाईट विनोद केले जातातमुलींना चुकीच्या नावाने संबोधले जातेकधी चुकीचे स्पर्श तर कधी बलात्कारही...  त्यांना गर्भातच मारणारे मारेकरी खुलेआम फिरत असतात... कधी जिवंत जाळलं जातंकधी ASID तर कधी तंदूर भट्टी... (खरे तरभारतीय स्त्रियांचे भावनिक शोषणही असेच भरघोस होत असते...) कायदे तर आहेतच... पण त्यांचा पुरेसा धाक कुठे आहेकुठेतरी कधीतरी हे संपूर्ण थांबलंच पाहिजे...

आणि सांप्रतच्या काळात याचा एकमेव उपाय म्हणजे आईनेच आपल्या मुलांना लहानपणापासून स्त्रियांचा आदर करायला शिकवलं पाहिजे. ही क्षमता फक्त आई नावाच्या स्त्रीमध्येच आहे...

शेवटीप्रत्येक स्त्रीला जन्म घेण्याचा हक्क आहे... तो तिच्या जगण्याचा हक्क आहे... आणि तो तिला निसर्गाने आणि कायद्यानेही दिला आहे... भविष्यात हा हक्क अबाधित राहील एवढीच लावा हृदयात सख्यांनो आशेची वात...!'

(लोककरंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहिलेली संहिता हा या ब्लॉगचा आधार आहे.)

 

 

 


Wednesday, 10 June 2020

अरुणा: सुटका, मुक्ती…… की नुसतेच मरण?

अरुणा,
नुसतेच अरुणा.अजून काय म्हणू?
माझ्या जन्मापूर्वी कधीतरी तुझ्यावर बलात्कार आणि प्राणघातक हल्ला झाला होता. (बलात्कार की बलात्काराचा प्रयत्न म्हणायचे? आपल्या कायद्याच्या कक्षेत तो बलात्कार नव्हता म्हणूनतसा कोणताच खटला सोहनलाल वाल्मिकीवर कधीच चालविला गेला नव्हता म्हणून…)
अन् त्यानंतर सुरु झाला तुझा अविरत प्रवास…  
पूर्वायुष्याची २ वर्षे बनाम उर्वरित ४२ वर्षे… 
तू आम्हाला आमच्या उमलत्या वयातही ठाऊक होती. कधीतरी कुठेतरी तुझा उल्लेख असायचा.. तुझ्याबरोबर काहीतरी खूप वाईट आणि अमानुष घडले आहे एवढे कळायचे... वाचण्यात सर्व संदर्भ कधीच यायचे नाहीत.
नंतर कधीतरी पिंकी विराणी लिखित आणि मीना कर्णिक अनुवादित ‘अरुणाची गोष्ट' हे पुस्तक वाचनात आले. कित्येक दिवस, कित्येक रात्री फक्त आणि फक्त अस्वस्थतेतच गेल्या...
त्याला अनेक कारणे होती..
एक तर, असे घडू शकते ? का घडू शकते ? आणि मग हे अगदी कोणाबरोबरही घडू शकते.... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू... तुझे आयुष्य... परिचारिकांचे तुझ्यावरील आटोकाट प्रेम आणि शरिरातील एक एक अवयव निकामी होत असतानाही तुझ्या शरिराची तुझ्या श्वासाबरोबर सुरु असलेली स्पर्धा... किती गं fighter तू ....
अरुणा, तुला काही बोलायचे, काही सांगायचे होते का गं?
जाणत्या आयुष्याशी संबंध तुटण्यापूर्वी अनुभवलेले ते शेवटचे काही क्षण... मारायचे होते सोहनलाल वाल्मिकीला? शिव्या द्यायच्या होत्या किंवा त्याहीपेक्षा भयानक काही शिक्षा ?
तू ज्या डॉ. सरदेसाई यांच्याशी लग्न करणार होतीस त्यांचे पुढे लग्न झाले तेव्हा तुझ्या आत अधिक काही तुटले का ?
वैद्यकशास्त्र म्हणते की तुझा मेंदू फक्त ७-८ महिन्याच्या बाळाचे काम द्यायचा पण मग तुला गोड पदार्थाची चव कशी कळायची? के.इ.एम.च्या माजी अधिष्ठात्री डॉ. प्रज्ञा पै सांगतात तसे तुला मासे खूपच प्रिय होते ना? पुरुषाचा स्पर्श, किंबहुना त्याचा आवाजही तुला सहन होत नव्हता... तुला आत खोल जाणीव होती ना सर्व गोष्टींची ?
एक चालते-बोलते-फुलते आयुष्य गळ्यात कुत्र्याची साखळी करकचल्यावर क्षणार्धात निस्तेज, मलूल होते... ना धड जीवन ना धड मृत्यू... मेंदूला प्राणवायू मिळत नव्हता.. त्याने सर्व संवेदना गोठलेल्या .. डोळ्यांना दिसत नव्हते... वाणी साथ देत नव्हती... विकल-विकल अवस्था... आणि हे सर्व का? तर तू रुग्णालयात तुझे काम, तुझे कर्तव्य चोख बजावत होतीस म्हणून...? कष्ट, शिस्त, वक्तशीरपणा, कामाप्रती निष्ठा असलेल्या तुझ्यासारख्या परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका लोकसेविकेला हे भोगायला लागावे ?
तुझं संपूर्ण आयुष्य गोठून गेलं आणि त्या नरपशूला फक्त ७ वर्षांची शिक्षा?
बघ अरुणा... एका सोहनलालमधून आज अनेक सोहनलाल गावागावात, शहरा-शहरात, गल्ली-गल्लीत जन्माला आलेत... 
आपण ज्यावेळी ‘पाशवी’ शब्द वापरतो तेव्हा पशूंचा अपमान तर नाही ना करत? कारण पशुजगत हे त्यांच्या निसर्गदत्त गुणधर्माप्रमाणेच वागत असते गं... पण माणसाकडे तथाकथित विकसित बुद्धी आहे ना ? 
एक स्त्री म्हणून तुझी फरफट झालीच पण ‘अरुणा शानबाग’ म्हणूनही झाली... एवढ्या भावंडांची जबाबदारी पेलण्यासाठी तू हळदीपूर ते मुंबई प्रवास केलास त्यातील एकालाही तुझी जबाबदारी उचलावीशी नाही वाटली... सुरुवातीला काही दिवस तुझी बहीण येत होती असे ऐकले... आणि मग ? चुकून कधीतरी भेटावेसे नाही वाटले कोणाला? विशेषतः के.इ.एम. रुग्णालयाने तुझी संपूर्ण जबाबदारी उचलल्यावर तरी लाजे-काजेस्तव कोणी यायला हवे होते गं...
पिंकी विराणींनी तुला दयामरण मिळवून देण्याचा प्रयत्न केला.. कारण तू बरी होऊन पुन्हा समाजात वावरायची शक्यता अजिबात नव्हती. कायद्याने तुला न्याय नाही मिळवून दिला तेव्हा जो समाज हातावर हात धरून शांत बसला होता तोच समाज यावेळी मात्र सर्व बाजूंनी बोलायला लागला. कायद्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही आणि जेव्हा फुकटचे मत व्यक्त करायला मिळते तेव्हा लोक संधी सोडत नाहीत... निदान पिंकी विराणी यांनी जी याचिका दाखल केली होती त्यामागील भावना तर नक्कीच समजावून घेता आली असती. शेवटी कायद्यानेही passive euthanasia मान्य केलाच पुढे जाऊन....
तुझ्याबाबत मात्र तोही विशेषाधिकार (privilege) नाकारला गेला; पण तरीही निमित्त तर तूच ठरलीस ना...
कित्येक लोकांना तर पुस्तक निघाल्यावर कळले की तुझ्यावर बलात्कारसुद्धा झाला होता... आणि तोही अनैसर्गिक... अर्थात बलात्कारात काय नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणा... सर्व शब्दांचाच खेळ शेवटी.. तो पद्धतशीरपणे लपवला गेला.. वैद्यकीय चाचण्यांमध्ये सिद्ध झाला नाही... आरोपीला जुजबी शिक्षा झाली... चोरीच्या आरोपाखाली !
जसा तुझ्या चैतन्यमय आयुष्याचा त्या नराधमाने अपमान केला अगदी तसाच तुझ्या अचेतन आयुष्याचाही फक्त अपमानच केला गेला... कदाचित तुझ्या परिचारिका सख्यांकडून तुला प्रेम मिळालेही असेल भरपूर... पण कायद्याकडून न्याय नाही मिळाला... अचेतन अवस्थेतही तू भयग्रस्त असायचीस आणि पुरुष माणसाचा आवाज ऐकला तरी बिथरायचीस ना ?
तुला ठाऊक आहे अरुणा, आपल्या समाजात अशीही काही माणसे आहेत अजून ज्यांना सोहनलालसारख्या कित्येक नराधमांच्या मानवी हक्कांबद्दल कळवळा आहे... पण ज्याने हा अन्याय भोगला आहे.. प्रदीर्घ काळ अंगावर वागवला आहे... जो बळी आहे त्याच्या हक्कांबद्दल काय ? कितीही घृणास्पद चुकांसाठी उपाय हा ‘माफी’ असेल तर मग...
अरुणा... १८ मे, २०१५... अर्थात तुझा मृत्यू झाला त्या दिवशी, पक्षी: त्या रात्री हा ब्लॉग लिहायला घेतला होता.. त्याला आता पाच वर्षे होत आली... नुसतेच अस्वस्थ नाही... तर असहाय, अपराधी वाटायचे... तुझ्या उत्तर-आयुष्यातील ती ४२ वर्षे शब्दात कशी पकडायची गं... कुठून आणायचे शब्द... कुठून आणायचा धीर... नाही सुचले काही ... मग ठेवून दिले तसेच... खूप इच्छा व्हायची पण तुझ्या अमूर्त, निराकार त्रासाने माझ्या शब्दांची लगाम खेचली होती...
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी अरुणा तुझी ही जखम संपूर्ण स्त्रीवर्ग कल्पांतापर्यंत आपल्या माथी वागवत राहील.. याच जाणिवेसह आज लेखन पूर्ण झाले...
- पूर्णिमा.


अरुणा: सुटका, मुक्ती की.... नुसतेच मरण ?