दशकांमागुन
सरली दशके
अन् शतकांच्या
गाथा गं,
ना वाटांचा मोह
सुटे, वा
ना मोहाच्या
वाटा गं,
पथ चकव्याचा
गोल सरळ वा
कुणास उमगत
नाही गं,
प्रवास कसला
फरफट अवघी,
पान जळातुन
वाही गं॥
कवी संदीप खरे यांच्या या ओळी स्त्रियांसाठी
नसतीलही कदाचित पण तरीही स्त्रियांची अनेक शतकांची फरफट अधोरेखित करतात.
अर्थात
ज्या संस्कृतीने या स्त्रीला अंधारात लोटले त्यातीलच काही सुज्ञ पुरुषांनी तिला
तिची नव्याने ओळखही करून दिली. त्यांना थोडे-बहुत यशही मिळाले पण अजून बराच मोठा
पल्ला गाठायचा आहे. जगात अभिमानाने मिरवण्याइतकी चांगली स्थिती नक्कीच नाही आपल्या
स्त्रियांची.
स्त्रियांच्या अस्तित्वाबाबत जेवढा विरोधाभास
आढळतो तेवढा इतर कुठल्याच बाबतीत आढळत नाही. मी तुम्हाला पुराणातला एकही दाखला
देणार नाही. आपण जे समोर आहे त्याचाच विचार करू.
एकीकडे आकाशभरारी घेणारी स्त्री तर दुसरीकडे
आईच्या गर्भातून चौथ्या महिन्यात खुडून टाकलेला स्त्री-भ्रूण.....
एकीकडे देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या
स्त्रिया तर दुसरीकडे मारझोड सहन करणाऱ्या आणि त्यालाच आपले प्राक्तन मानणाऱ्या
स्त्रिया...
एकीकडे उच्चविद्याविभूषित स्त्रिया तर दुसरीकडे
साधे प्राथमिक शिक्षणही न घेता आलेल्या
स्त्रिया... पण
सर्वात अधम पातळी कुठली असेल तर ती म्हणजे मुलीचा जन्म घेण्याचा अधिकारच नाकारणे.
आम्हाला वाटते की आम्ही शहरात राहतो, आमच्याकडे असे
होत नाही, आमचा याच्याशी संबंध नाही, हे सर्व गावच्या ठिकाणी घडते... भलतीच गैरसमजूत ! ग्रामीण
भागातील मुलींच्या जन्मदरापेक्षा शहरी भागातील जन्मदर हा कमी आहे... धक्का बसला का? इतकाच नाही तर जनगणनेनुसार २००१ पेक्षा २०११ साली शहरी
मुलींचे प्रमाण अधिक कमी झाले आहे...
भारतातील ४-५ प्रमुख शहरात राहणाऱ्या मुली.... ज्यांना कदाचित हेही ठाऊक नसेल की त्यांच्यासारख्याच १२-१३ वर्षांच्या अजून काही मुली आहेत ज्या भावंडे सांभाळतात, जेवण बनवतात, घर सांभाळतात, वेळ पडली तर अन्यत्र जाऊन राबतातही, शाळेवर तुळशीपत्र ठेवतात...
मूठभर सुरक्षित मुली किंवा स्त्रिया म्हणजे
संपूर्ण समाज नाही. ४
- ५ प्रमुख शहरे म्हणजे संपूर्ण भारत देश नाही. खरे तर तथाकथित सन्मानाने जगणाऱ्या मुलीही याच मुलींच्या परिघात आहेत फक्त
त्यांच्या समस्या वेगळ्या आणि यांच्या वेगळ्या... पण समस्या आहेत आणि त्या स्त्री
असण्याशी संबंधितच आहेत.
सवाल
आहे समाजपुरुषाच्या सोयीने बदलणाऱ्या मानसिकतेचा...
त्याला हवे तेव्हा स्त्री घरी राहिली, त्याला वाटले
तेव्हाच ती उंबरठ्याबाहेर पडली... त्याला हवे असेल तरच मुलगी जन्माला येते, नको असेल
तेव्हा गवत उपटण्याएवढे सहज तिला गर्भातच उपटून टाकले जाते, कोल्ह्या-कुत्र्यांना
खायला रुग्णालयाबाहेर किंवा नदीकाठी सोडले जाते...
स्त्री म्हणून जन्म घ्यायचा नाही? का? कुठे हुंड्याचा
प्रश्न असतो... कुठे मुलाच्या नावाने वंश वाढवायचा असतो... कुठे अरे बापरे, पुन्हा मुलगीच? मुलगी म्हणजे
ओझे, परक्याचे धन..
तिला कशाला इतके शिकवायचे ही मानसिकता असते... पुन्हा जन्माबरोबर प्रश्न उभा राहतो तो स्त्रियांच्या
सुरक्षिततेचा. ज्या वेगाने स्त्रीविषयक गुन्हे घडत आहे ते बघता त्यांची सुरक्षितता ही
आईवडिलांना डोकेदुखीच ठरते आहे; यापेक्षा तिला
उकळत्या दुधात टाकणे किंवा वाळूत पुरणे जास्त सोपे होते...
आता तर या गोष्टीही करायची गरज भासत नाही कारण
आधुनिक तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की चौथ्या महिन्यात कळते की मुलगी आहे
की मुलगा.. कायद्याने गर्भजल परीक्षेला बंदी आहे... पण डॉक्टरकीच्या पवित्र पेशाला
काळिमा फासणारे काही नरराक्षस मूठभर दिडक्यांसाठी एका छोटुलीच्या जीवाचा आरामात
सौदा करतात...
गेल्या ३० वर्षात जवळपास ७० लाखाहून अधिक
अजन्मा आईच्या गर्भातच विरल्या... त्या ७० लाख मुली जन्माला आल्या असत्या तर आज
कुठे असत्या? कुठे आहे माणुसकी? कुठे आहे नैतिकता? कुठे आहे कायद्याची जरब?
त्यातूनही जन्म घेतलाच तर काहींच्या नशिबी कधी
घरकामाचं तर बालमजुरीचं जोखड, कधी लैंगिक
शोषणाचे बळी, कधी मुलांची
तस्करी. निदान हे अन्याय-अत्याचार डोळ्यांसमोर तरी होतात. प्रसंगी ते उघडकीस आले
तर त्यावर कायदेशीररीत्या शिक्षा तरी आहे; पण समाजपुरुषाने अखंड स्त्रीजातीला वेठीला धरले आहे... ‘गुलामाला
त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.’ असे डॉ.
आंबेडकर म्हणाले होते ते स्त्रियांच्याबाबतही तंतोतंत लागू होते.
खरेच स्त्रिया आपले फुलणे विसरल्या आहेत.
जेव्हा घराला गरज पडली तेव्हा त्यांना डोईवरचा पदर खांद्यावर घेत घराबाहेर पडावेच
लागले.... नोकरी, मूल, संसार, नातेवाईक, सणवार... सर्व
जबाबदारी त्यांना उचलावी लागली...
निसर्ग मोठा जादूगार आहे. मानवाचा वंश
वाढविण्यासाठी त्याने स्त्रीची शारीरिक रचना वेगळी केली. समाजाने मात्र यावरूनच
तिला कमी लेखले. तिचे आभार मानायचे सोडून तिला कधी कडी-कुलपात, कधी
वस्त्र-अलंकारात, कधी रूढी-बंधनात अडकवून ठेवले.. मग पुरुष तिचा ‘धनी’ झाला.. ‘मालक’ झाला... मालकी
हक्काने आपल्या स्त्रीवर तो स्वतःचे नाव कोरु लागला आणि स्त्रिया आपले मूळ नाव
विसरून मालकाचे नाव लावू लागल्या....
समाजसुधारकांनी या स्त्रीला शिक्षित केले, अपमानास्पद
रूढी-बंधनातून तिला मोकळे करण्याचे प्रयत्न केले... पण त्या बंधनांचे काय जी
स्त्रीने स्वखुशीने घालून घेतली आहेत? वास्तविक ज्या नावाने स्त्री जन्माला येते, वाढते, समाजात आत्मविश्वासाने वावरते त्याच नावाने ती शेवटचा श्वासदेखील घेऊ शकते...
मग स्वतःची ओळख गमावण्याचा अट्टाहास ती का करते ?
एका स्त्रीने आधी स्वतःचा आणि
मग दुसऱ्या स्त्रीचा आदर राखायला शिकले पाहिजे... ती कुमारी, ती सौभाग्यवती, ती विधवा... यापेक्षाही तिचे
निखळ स्त्री असणे हे जास्त महत्त्वाचे नाही का?
घर बनते ते त्या घरातील
प्रत्येक माणसाच्या सहकार्याने मग सर्व नाती जपायची ती स्त्रीनेच? तिला माणूस म्हणून पुरुषाचा आदर करू द्या आणि एक माणूस म्हणूनच आदर मिळवू द्या. रस्त्यावर एखादी स्त्री जाते तेव्हा म्हणतात, ‘स्त्री/बाई’ जातेय; पण पुरुष जात असेल तर म्हणतात ‘माणूस’ जातोय... बघा, तुमचे निरीक्षण काय सांगतेय? स्त्री माणूस नाही का? वर्षोनुवर्षे जिभेला लागलेलं वळण जे बदलू शकत नाहीत ते सहजासहजी स्त्रीला समान
स्थान देतील?
‘बायको आहेस बायकोसारखी रहा, नवरा बनायचा प्रयत्न करू नकोस.’..म्हणजे नक्की काय? नवऱ्याचा स्तर आणि पत्नीचा स्तर तुम्ही परंपरेने ठरवत आणि पाळत आलात; पण ज्या दिवशी घरट्यासाठी स्त्रीने उंबरठ्याबाहेर पाउल टाकले त्यादिवशीच या
स्तरातील अंतर कमी होण्यास सुरुवात झाली होती. अर्थात सुंभ जळाला पण पीळ नाही
गेला.
अगदी आजही बदलत्या काळात स्त्रियांवर किती वाईट
विनोद केले जातात, मुलींना
चुकीच्या नावाने संबोधले जाते, कधी चुकीचे
स्पर्श तर कधी बलात्कारही... त्यांना
गर्भातच मारणारे मारेकरी खुलेआम फिरत असतात... कधी जिवंत जाळलं जातं, कधी ASID तर कधी तंदूर भट्टी... (खरे तर, भारतीय स्त्रियांचे भावनिक शोषणही असेच भरघोस होत असते...) कायदे तर आहेतच... पण त्यांचा पुरेसा धाक कुठे आहे? कुठेतरी कधीतरी
हे संपूर्ण थांबलंच पाहिजे...
आणि सांप्रतच्या काळात याचा एकमेव उपाय म्हणजे आईनेच
आपल्या मुलांना लहानपणापासून स्त्रियांचा आदर करायला शिकवलं पाहिजे. ही क्षमता
फक्त आई नावाच्या स्त्रीमध्येच आहे...
शेवटी, प्रत्येक स्त्रीला जन्म घेण्याचा हक्क आहे... तो तिच्या जगण्याचा हक्क आहे...
आणि तो तिला निसर्गाने आणि कायद्यानेही दिला आहे... भविष्यात
हा हक्क अबाधित राहील एवढीच ‘लावा हृदयात सख्यांनो आशेची
वात...!'
(लोककरंडक
वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहिलेली संहिता हा या ब्लॉगचा आधार आहे.)
No comments:
Post a Comment