नुसतेच
अरुणा.… अजून काय म्हणू?
माझ्या
जन्मापूर्वी कधीतरी तुझ्यावर बलात्कार आणि प्राणघातक हल्ला झाला होता. (बलात्कार की बलात्काराचा
प्रयत्न म्हणायचे? आपल्या कायद्याच्या कक्षेत तो बलात्कार
नव्हता म्हणून… तसा कोणताच खटला सोहनलाल वाल्मिकीवर कधीच चालविला गेला नव्हता म्हणून…)
अन्
त्यानंतर सुरु झाला तुझा अविरत प्रवास…
पूर्वायुष्याची
२५
वर्षे बनाम उर्वरित ४२ वर्षे…
तू आम्हाला आमच्या उमलत्या वयातही ठाऊक होतीस. कधीतरी कुठेतरी तुझा
उल्लेख असायचा.. तुझ्याबरोबर काहीतरी खूप वाईट आणि अमानुष घडले आहे एवढे कळायचे... वाचण्यात
सर्व संदर्भ कधीच यायचे नाहीत.
नंतर
कधीतरी पिंकी विराणी लिखित आणि मीना कर्णिक अनुवादित ‘अरुणाची गोष्ट' हे पुस्तक वाचनात आले.
कित्येक दिवस, कित्येक रात्री फक्त आणि फक्त अस्वस्थतेतच गेल्या...
त्याला अनेक कारणे होती..
एक तर, असे घडू शकते ? का घडू शकते ? आणि मग हे अगदी
कोणाबरोबरही घडू शकते.... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू... तुझे आयुष्य...
परिचारिकांचे तुझ्यावरील आटोकाट प्रेम आणि शरिरातील एक एक अवयव निकामी होत
असतानाही तुझ्या शरिराची तुझ्या श्वासाबरोबर सुरु असलेली स्पर्धा... किती गं
fighter तू ....
अरुणा, तुला काही बोलायचे, काही सांगायचे होते का गं?
जाणत्या आयुष्याशी संबंध तुटण्यापूर्वी अनुभवलेले ते शेवटचे
काही क्षण... मारायचे होते सोहनलाल वाल्मिकीला? शिव्या द्यायच्या होत्या किंवा
त्याहीपेक्षा भयानक काही शिक्षा ?
तू ज्या डॉ. सरदेसाई यांच्याशी लग्न करणार होतीस त्यांचे पुढे
लग्न झाले तेव्हा तुझ्या आत अधिक काही तुटले का ?
वैद्यकशास्त्र म्हणते की तुझा मेंदू फक्त ७-८ महिन्याच्या
बाळाचे काम द्यायचा पण मग तुला गोड पदार्थाची चव कशी कळायची? के.इ.एम.च्या माजी
अधिष्ठात्री डॉ. प्रज्ञा पै सांगतात तसे तुला मासे खूपच प्रिय होते ना? पुरुषाचा
स्पर्श, किंबहुना त्याचा आवाजही तुला सहन होत नव्हता... तुला आत खोल जाणीव होती ना
सर्व गोष्टींची ?
एक चालते-बोलते-फुलते आयुष्य गळ्यात कुत्र्याची साखळी करकचल्यावर
क्षणार्धात निस्तेज, मलूल होते... ना धड जीवन ना धड मृत्यू... मेंदूला प्राणवायू
मिळत नव्हता.. त्याने सर्व संवेदना गोठलेल्या .. डोळ्यांना दिसत नव्हते... वाणी
साथ देत नव्हती... विकल-विकल अवस्था... आणि हे सर्व का? तर तू रुग्णालयात
तुझे काम, तुझे कर्तव्य चोख बजावत होतीस म्हणून...? कष्ट, शिस्त, वक्तशीरपणा,
कामाप्रती निष्ठा असलेल्या तुझ्यासारख्या परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका
लोकसेविकेला हे भोगायला लागावे ?
तुझं संपूर्ण आयुष्य गोठून गेलं आणि त्या नरपशूला फक्त ७
वर्षांची शिक्षा?
बघ अरुणा... एका सोहनलालमधून आज अनेक सोहनलाल गावागावात,
शहरा-शहरात, गल्ली-गल्लीत जन्माला आलेत...
आपण ज्यावेळी ‘पाशवी’ शब्द वापरतो
तेव्हा पशूंचा अपमान तर नाही ना करत? कारण पशुजगत हे त्यांच्या निसर्गदत्त
गुणधर्माप्रमाणेच वागत असते गं... पण माणसाकडे तथाकथित विकसित बुद्धी आहे ना
?
एक स्त्री म्हणून तुझी फरफट झालीच पण ‘अरुणा शानबाग’
म्हणूनही झाली... एवढ्या भावंडांची जबाबदारी पेलण्यासाठी तू हळदीपूर ते मुंबई
प्रवास केलास त्यातील एकालाही तुझी जबाबदारी उचलावीशी नाही वाटली... सुरुवातीला
काही दिवस तुझी बहीण येत होती असे ऐकले... आणि मग ? चुकून कधीतरी भेटावेसे नाही
वाटले कोणाला? विशेषतः के.इ.एम. रुग्णालयाने तुझी संपूर्ण जबाबदारी उचलल्यावर तरी
लाजे-काजेस्तव कोणी यायला हवे होते गं...
पिंकी विराणींनी तुला दयामरण मिळवून देण्याचा प्रयत्न
केला.. कारण तू बरी होऊन पुन्हा समाजात वावरायची शक्यता अजिबात नव्हती. कायद्याने
तुला न्याय नाही मिळवून दिला तेव्हा जो समाज हातावर हात धरून शांत बसला होता तोच
समाज यावेळी मात्र सर्व बाजूंनी बोलायला लागला. कायद्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही
आणि जेव्हा फुकटचे मत व्यक्त करायला मिळते तेव्हा लोक संधी सोडत नाहीत... निदान
पिंकी विराणी यांनी जी याचिका दाखल केली होती त्यामागील भावना तर नक्कीच समजावून
घेता आली असती. शेवटी कायद्यानेही passive
euthanasia मान्य केलाच पुढे जाऊन....
तुझ्याबाबत मात्र तोही विशेषाधिकार (privilege) नाकारला गेला; पण तरीही निमित्त
तर तूच ठरलीस ना...
कित्येक लोकांना तर पुस्तक निघाल्यावर कळले की तुझ्यावर
बलात्कारसुद्धा झाला होता... आणि तोही अनैसर्गिक... अर्थात बलात्कारात काय
नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणा... सर्व शब्दांचाच खेळ शेवटी.. तो पद्धतशीरपणे लपवला
गेला.. वैद्यकीय चाचण्यांमध्ये सिद्ध झाला नाही... आरोपीला जुजबी शिक्षा झाली... चोरीच्या
आरोपाखाली !
जसा तुझ्या चैतन्यमय आयुष्याचा त्या नराधमाने अपमान केला
अगदी तसाच तुझ्या अचेतन आयुष्याचाही फक्त अपमानच केला गेला... कदाचित तुझ्या
परिचारिका सख्यांकडून तुला प्रेम मिळालेही असेल भरपूर... पण कायद्याकडून न्याय
नाही मिळाला... अचेतन अवस्थेतही तू भयग्रस्त असायचीस आणि पुरुष माणसाचा आवाज ऐकला
तरी बिथरायचीस ना ?
तुला ठाऊक आहे अरुणा, आपल्या समाजात अशीही काही माणसे आहेत अजून
ज्यांना सोहनलालसारख्या कित्येक नराधमांच्या मानवी हक्कांबद्दल कळवळा आहे... पण
ज्याने हा अन्याय भोगला आहे.. प्रदीर्घ काळ अंगावर वागवला आहे... जो बळी आहे
त्याच्या हक्कांबद्दल काय ? कितीही घृणास्पद चुकांसाठी उपाय हा ‘माफी’ असेल तर मग...
अरुणा... १८ मे, २०१५... अर्थात तुझा मृत्यू झाला त्या दिवशी,
पक्षी: त्या रात्री हा ब्लॉग लिहायला घेतला होता.. त्याला आता पाच वर्षे होत
आली... नुसतेच अस्वस्थ नाही... तर असहाय, अपराधी वाटायचे... तुझ्या उत्तर-आयुष्यातील
ती ४२ वर्षे शब्दात कशी पकडायची गं... कुठून आणायचे शब्द... कुठून आणायचा धीर... नाही
सुचले काही ... मग ठेवून दिले तसेच... खूप इच्छा व्हायची पण तुझ्या अमूर्त, निराकार
त्रासाने माझ्या शब्दांची लगाम खेचली होती...
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी अरुणा तुझी ही जखम संपूर्ण स्त्रीवर्ग
कल्पांतापर्यंत आपल्या माथी वागवत राहील.. याच जाणिवेसह आज लेखन पूर्ण झाले...
- पूर्णिमा.
अरुणा: सुटका, मुक्ती की.... नुसतेच मरण ?
निशब्द...!
ReplyDeleteNice artical... Aruna nanter he thamble nahi punha punha Aruna janm ghet hoti kadhi Delhi ter kadhi kathua ...
ReplyDeleteन भरणारी जखम अरुणा..
ReplyDelete